शहरातील ३ कॅफेवर कारवाई; मालकांविरुद्ध गुन्हा दाखल !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – कॉफी शॉपच्या नावाने मुला, मुलींचे अश्लील चाळे सुरू असलेल्या कॅफे इन्फिनिटी, कॅफे लवबक्स, ब्लीस कॅफे या तीन कॉफी शॉपवर रामानंद नगर पोलिसांनी शनिवारी (९ मे) कारवाई केली. यात कॅफे सेंटर मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नामांकित महाविद्यालयानजीक असलेल्या नाईटी डिग्री परिसरात तीन कॉफी शॉपमध्ये मुला-मुलींना जागा उपलब्ध करून देत तेथे अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी पथकास कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक तेथे पोहोचले असता कॅफे सेंटरमध्ये कंपार्टमेंट करून व पडदे लावून जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळून आले.
कॉफी शॉपच्या नावाने चालणाऱ्या या कंपार्टमेंटच्या ठिकाणी शॉपचा परवाना नव्हता व कॉफी तयार करण्याचे कोणेतेही साहित्य नव्हते. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून कॅफे इन्फिनिटी, कॅफे लवबक्स, ब्लीस कॅफेच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

