वनविभागाची मोठी कारवाई : ५० हजारांचे सागवान बेलन जप्त !
चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – चोपडा तालुक्यातील अडावद येथील मन्यार वाड्यात वनविभागाने शनिवारी (दि. १४) दुपारी छापा टाकला असता सागवानाचे अंदाजे एक हजार अनघड कच्चे बेलन तर अकराशे तयार बेलन आणि खराद मशीन असा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे अवैध लाकडाचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दि. १२ रोजी अडावद-उनपदेव रस्त्यावरून सायकलींवर सागवान कच्चे बेलनची वाहतूक करतांना साग्यादेव परिसरातील रूपा पावरा व महेश पावरा या दोघांना वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे यांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना एक दिवसाची वन कोठडी मिळाली होती. वनाधिकाऱ्यांनी संशयितांकडून कुणाकुणाला सागवानचा अवैध कच्चा माल पुरविला गेला याची विचारपूस केली असता, त्यांनी अडावद येथील एकाची माहिती दिली. या माहितीच्या आधारे वनाधिकाऱ्यांनी अडावद येथील मन्यार वाड्यातील रहिवासी शे. रईस शे. ईसा मन्यार (वय ५०) यांच्या घरावर छापा टाकला. यात सागवान बेलन व अनघड कच्चे बेलन तसेच एक खराद मशीन असा समारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या कारवाईत अडावद वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे, वनपाल एस. पी. नागणे, योगेश साळुंके, भावना चव्हाण, आर. एस. निकुंभे, एन. जी. सपकाळे, एस. जी. पावरा, एच. के. तडवी, पी. एस. सपकाळे, प्रमिला मराठे, सुमित्रा पावरा, दशरथ पाटील, संजय माळी, राजू पाटील, अजिम तडवी, संजय तडवी, खलील तडवी, फकरोद्दीन तडवी, शब्बीर तडवी, रमजान तडवी, भरत अढाळके, मनोहर पाटील आदींचा समावेश होता.