पंढरपूरातील खुन प्रकरणातील आरोपीला जळगावात अटक
जळगाव : प्रतिनिधी खानदेश लाईव्ह न्युज
नगरसेवकाच्या खून प्रकरणातील तसेच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला पवन अनिल अधटराव (२६, पंढरपूर, जि. सोलापूर) याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेंदालाल मिल परिसरातून अटक केली. तो अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
पंढरपूर येथील पवन अधटराव याच्याविरुद्ध नगरसेवकाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. हाणामारी, प्राणघातक हल्ला यासह आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर सोलापूर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली. सहा महिन्यांपूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला व खंडणीचा गुन्हा दाखल झाला व तो सोलापूर येथून पसार झाला होता. पवन अधवटराव हा जळगावात असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या.
यांनी केली कारवाई
पवन हा जळगावातील गेंदालाल मिल परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून मध्यरात्रीच्या सुमारास तो लपून बसलेल्या घरावर छापा टाकला. या ठिकाणाहून घरात गाढ झोपलेल्या पवनला अटक केले. पुढील कारवाईसाठी त्याला पंढरपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर आंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भारत पाटील यांनी कारवाई केली.