शहरात निवृत्त सहायक फौजदाराचे चोरट्यांनी फोडले घर ; गुन्हा दाखल!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पत्नीसह रावेर येथे मुलाकडे गेलेले निवृत्त सहायक फौजदार चंद्रकांत माधवराव बडगुजर (६७, रा. दादावाडी) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख सात हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १४ ते २६ सप्टेंबर दरम्यान घडली आहेत.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत बडगुजर हे पत्नीसह १४ सप्टेंबर रोजी रावेर येथे शिक्षक असलेले पंकज बडगुजर या मुलाच्या घरी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातून रोख सात हजार रुपये, ३० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोनपोत, १० हजार रुपये किमतीच्या गणपतीच्या चांदीच्या दोन मूर्ती, चांदीचे लक्ष्मीचे शिक्के, जोडवे, असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शेजारी राहणाऱ्या महिलेने गुरुवारी (दि. २६) बडगुजर यांच्याशी संपर्क साधून दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यानंतर बडगुजर कुटुंबीय घरी आले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटून ते जिन्याखाली पडलेले दिसले. कपाटात ठेवलेली रोकड व सोन्या-चांदीचे दागिने दिसले नाहीत.
याप्रकरणी त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों धनराज पाटील करीत आहेत.