संजय ब्राह्मणे मुक्ताईनगर मतदारसंघातून मातब्बरांशी लढणार..!
मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी (कैलास कोळी) – वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते संजय पंडित ब्राह्मणे यांना मुक्ताईनगरातून वंचितची उमेदवारी जाहीर झाली असून या माध्यमातून ते मुक्ताईनगर मतदारसंघातील निवडणूक रिंगणातील मातब्बर उमेदवारांशी लढणार आहेत. बहुजन आघाडीने मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते संजयदादा ब्राह्मणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
वंचितने आधी जिल्ह्यातून रावेर मतदारसंघातून शमीभा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.तसेच पक्षाकडून अन्य ठिकाणी नेमकी कोणाला उमेदवारी देणार ? याबाबत मोठी उत्सुकता लागली होती.यानंतर संविधान आमचे संस्थापक अध्यक्ष जगनभाऊ सोनवणे यांना भुसावळातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.आणि आता मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.पक्षाने आज जाहीर केलेल्या यादीत त्यांना स्थान मिळाले आहे.संजय ब्राह्मणे यांनी अलीकडेच रावेर लोकसभा निवडणूक लढविली होती.यानंतर आता ते मुक्ताईनगरातून जनतेकडून कौल मागत आहेत. वंचितचा उच्चशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांचे शिक्षण बी.ई. सिव्हील झाले असून सार्वजनीक बांधकाम खात्यात अधिकारी म्हणून त्यांनी सुमारे वीस वर्ष काम केले.यानंतर २०१४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते राजकारणात उतरले आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार तर शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत.यातच आता वंचितच्या तिकिटावरून संजय ब्राह्मणे यांच्या सारखा सुशिक्षित व सर्वार्थाने प्रबळ,लोकप्रिय असणारा उमेदवार देखील मुक्ताईनगरातून लढत असल्याने येथील लढत ही अतिशय रंगतदार आणि लक्षवेधी ठरणार आहे.