साकेगाव महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण जागीच ठार !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहराजवळील साकेगाव महामार्गावर वाय पॉइंटलगत महामार्ग ओलांडत असताना अज्ञात भरधाव जाणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने हरीण जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.
साकेगाव वनविभाग तसेच शेत शिवारामध्ये हरणांचे व निलगायींचे मोठ्या प्रमाणात कळप आहेत. मात्र, जंगलाचा होणारा ऱ्हास व वनविभाग हद्दीत सातत्याने होणारे गौण खनिजाचे उत्खनन आदी कारणांमुळे नीलगायी व हरीण हे आता महामार्गाकडे अर्थात रहिवासी परिसराकडे येऊ लागले आहेत. अशातच सोमवारी महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये हरीण जागीच ठार झाले. ठार झालेल्या हरीणाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. साकेगावकरांनी रस्त्यावर पडलेल्या हरणाला कडेला केले.