अग्निविर ही खऱ्या अर्थाने सैनिक व सुज्ञ नागरिक घडविणारी योजना आहे – डॉ. एस.ए.पाटील
फैजपूर : खानदेश लाईव्ह प्रतिनिधी
येथील धनाजी नाना महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग युवतीसभा अंतर्गत घेण्यात आलेल्या “पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचा” समारोप समारंभाचे प्रमुख वक्ते डॉ.एस.ए.पाटील यांनी सैन्य दलात विविध वनस्पतींचा कसा उपयोग होऊ शकतो या विषयी महत्त्वाची माहिती दिली. अग्निविर ही सैनिक व सुज्ञ नागरिक घडविणारी योजना आहे कारण यामुळे तरुण वयात विद्यार्थ्यांना कणखर बनण्याचे व अनुशासनबुद्ध जीवन जगण्याचे कौशल्य विकसित करण्याची संधी मिळते. म्हणून ही योजना फक्त सैनिकच घडवत नाही तर एक जबाबदार नागरिक ही घडविते असे सांगितले.
प्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी. वाघुळदे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे, प्रा. अचल भोगे, डॉ. जयश्री पाटील, अग्निविर व पोलीस भरती प्रशिक्षण कार्यशाळे अंतर्गत मागील सहा दिवस सैन्य दलातील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. या सहा दिवसात रोज सकाळी दीड तास परेड आणि दीड तास मार्गदर्शन असे दर दिवशी दोन सत्राचे नियोजन होते. पहिल्या दिवशी औरंगाबाद येथील सैनिक अधिकारी कर्नल अनुज सिंह यांनी सैन्य दलाविषयी सखोल माहिती देत अग्नीवीर भरती प्रक्रिया आणि प्रत्यक्ष भरती झाल्यानंतर ची सैनिकांची जबाबदारी याविषयी सखोल माहिती दिली. दुसऱ्या दिवशी मेजर स्मिता चौधरी यांनी पोलीस भरती व अग्निवीर भरतीसाठी युवकांनी व युतीने कशाप्रकारे तयारी करायची असते ते समजावून सांगितले. तिसऱ्या दिवशी माजी बीएसएफ अधिकारी युवराज गाढे यांनी अतिशय परिश्रम घेत युवकांकडून सर्व प्रकारच्या पर्स ड्रिल्स करून घेतल्या व दुसऱ्या सत्रात मॅप रीडिंग व शस्त्रांची सखोल अशी माहिती दिली. चौथ्या दिवशी महाराष्ट्र अठरा बटालियन जळगावचे सुभेदार अमोल साळुंखे यांनीही भरती पूर्वीचे युवक आणि भरतीनंतरचे सैन्य दलातील अनुभव याविषयी सखोल मार्गदर्शन केले व अग्निवीर ही आणीबाणीच्या वेळी नक्कीच या देशाला बॅकअप फौज म्हणून काम करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे सांगितले. पाचव्या दिवशी विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र फैजपूरचे संचालक आकाश तायडे यांनी अग्नीवीर व पोलीस भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षा त्यांचे फॉर्म भरण्याची पद्धत, परीक्षा पूर्वतयारी, परीक्षेसाठी विचारले जाणारे घटक या विषयावर सखोल माहिती दिली व विद्यार्थ्यांकडून प्रश्न जाणून घेत त्यांचे निराकरण केले. तर सहाव्या दिवशी समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. एस.ए.पाटील यांनीही वनस्पतींचा सैन्य दलात उपयोग याविषयी सखोल मार्गदर्शन केले विविध वनस्पतींच्या युद्धाच्या वेळी व बिकट परिस्थितीत कसा वापर केला जातो याविषयी माहिती दिली.
समारोप प्रसंगी जान्हवी जंगले, समीर तडवी, साक्षी सरोदे या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करत सैन्य दलाविषयी जाणीव निर्माण करतांना स्वतःतील उणीवांचीही जाणीव झाली व त्या कशा प्रकारे दूर करायच्या याचेही मार्गदर्शन या कार्यशाळेच्या माध्यमातून मिळाले असे सांगितले. प्रास्ताविक कार्यशाळा संयोजक डॉ. विजय सोनजे यांनी तसेच सूत्रसंचालन प्रा. शिवाजी मगर व आभार अचल भोगे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शिवाजी मगर, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, ओमसिंग राजपूत, ईश्वर चौधरी, दिगंबर भंगाळे, सागर ठाकूर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.