मुक्ताईनगर परिसरात अवैध माती, मुरूम व वाळू वाहतूक उफाळली; नागरिक त्रस्त
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी मुक्ताईनगर परिसरात दिवसाढवळ्या होत असलेल्या अवैध विना परवाना माती, मुरूम, वाळू तसेच नदी पात्रातून गाळ वाहतुकीमुळे परिसरात गंभीर समस्या निर्माण झाल्या असून, सामान्य नागरिक व दुचाकीस्वारांचे जीवन धोक्यात आले आहे.
राजेंद्र पंडित कापसे रा. मुक्ताईनगर यांनी याबाबत तहसिलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली असून, महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे ही वाहतूक बिनधास्त सुरू आहे. त्यांनी नमूद केले की, भरधाव ट्रॅक्टर, डंपर व हायव्हा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नुकताच श्री. अनिल बोदडे यांना अशाच एका डंपरने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय, धूळ व मातीमुळे अनेक दुचाकीस्वारांचे डोळ्यांचे नुकसान होऊन मृत्यूमुखीही पडावे लागले आहे.

या वाहनांना हटकले असता ते महसूल अधिकाऱ्यांना हप्ते देतो, त्यामुळे कोणी त्यांच्यावर कारवाई करत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
राजेंद्र कापसे यांनी इशारा दिला आहे की, जर ही अवैध वाहतूक तातडीने थांबविण्यात आली नाही, तर महसूल प्रशासनाविरुद्ध आमरण उपोषण छेडले जाईल