Sunday, July 20, 2025
Homeगुन्हाशिरसाळा मारुतीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना वाळूच्या डंपरला दुचाकी धडकून तरुण जागीच...

शिरसाळा मारुतीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना वाळूच्या डंपरला दुचाकी धडकून तरुण जागीच ठार!

शिरसाळा मारुतीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना वाळूच्या डंपरला दुचाकी धडकून तरुण जागीच ठार!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पुढे जाणाऱ्या वाळूच्या डंपरने इंडिकेटर न देता वळण घेतल्याने त्यावर दुचाकी धडकून हर्षल राजू पाटील (१९, रा. वराड बुद्रुक, ता. धरणगाव) हा तरुण ठार झाला. तसेच त्याच्या मागे बसलेला कुणाल गोकूळ पाटील (१९, रा. वराड बुद्रुक, ता. धरणगाव) हा तरुण जखमी झाला. बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे मारुतीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना शनिवारी (१९ जुलै) सकाळी साडेसहा वाजता महामार्गावर नशिराबादजवळ हा अपघात झाला.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, वराड बुद्रुक येथील दुग्धव्यावसायिक राजू पाटील यांचा मुलगा हर्षल पाटील याच्यासह गावातील काही तरुण १० ते १२ दुचाकी व कारने शनिवारी शिरसाळा येथे मारुतीच्या दर्शनासाठी जात होते. त्यासाठी ते पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास वराड येथून सोबत निघाले. यात हर्षलची दुचाकी नशिराबाद उड्डाणपुलावरून असताना पुढे जाणाऱ्या एका वाळूच्या जात डंपरने (क्र. एमएच १६, एई ६४११) इंडिकेटर न देता अचानक डाव्या बाजूला वळण घेतले. त्यावेळी दुचाकी त्यावर धडकली व त्यात दुचाकीस्वार हर्षल पाटील यांच्या डोक्याला, चेहऱ्याला, छातीला जबर मार लागला. तसेच मागे बसलेल्या कुणाल पाटील यालाही जबर दुखापत झाली. अपघात झाला त्या वेळी इतर दुचाकीस्वार मित्र पुढे होते तर एक दुचाकी मागे होती. मागे असलेल्या या दुचाकीवरील मित्रांनी हा अपघात पाहिला व या विषयी नातेवाईक तसेच मित्रांना माहिती दिली. हर्षल पाटील याच्या चुलत भावाचा १९ जुलै रोजी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाचे हर्षलने पहाटे पाच वाजताच स्टेटस ठेवून शिरसाळा येथे जाण्यासाठी निघाला होता. मात्र वाटेतच काळाने झडप घातली. ज्याचा वाढदिवस होता तोदेखील दर्शनासाठी जात होता. हर्षलच्या अपघाताची माहिती मिळताच त्याच्या वडिलांचे पिंप्राळा परिसरातील मित्र अतुल बारी, दिलीप बारी, जुबेर तडवी यांच्यासह मित्र परिवार व नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेऊन राजू पाटील यांना धीर दिला.

हर्षल पाटील याचे आई, वडील, मोठी बहीण तसेच काका, काकू, चुलत भाऊ, बहीण यांच्यासह १५ ते २० जणांचे एकत्र कुटुंब वराड येथे राहते. आई-वडिलांना हर्षल हा एकच मुलगा होता व तो नुकताच इयत्ता बारावी उत्तीर्ण होऊन धरणगाव येथील महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या प्रथम वर्षाला होता. त्याचा २० ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो, महिनाभरावर वाढदिवस आला असताना त्यापूर्वीच त्याला काळाने हिरावून घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या