मंत्र्यांसह पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मंत्र्यांसह पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध बुधवारी सायंकाळी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी दुपारी सावदा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर खडसे यांनी त्यांना बोलावून घेतले. यावेळी त्यांनी तासखेडा (ता. रावेर) येथील गौण खनिज प्रकरणात गुन्हा का दाखल केला नाही, असा जाब विचारत मोठ्या आवाजात आरडाओरडा केला. तसेच तुम्ही कोट्यवधी रुपये खाल्ले आहेत, असे म्हणत अपमानास्पद शब्द वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांनी याबाबत २९ जानेवारी २०२६ रोजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी भातेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असल्याची माहिती त्यांना दिली. मात्र, तपास सुरू असल्याने कागदपत्रे देण्यास नकार दिल्याने खडसे अधिकच संतप्त झाले. त्यांनी आगामी अधिवेशनात बघून घेतो, अॅन्टी करप्शनचा ट्रॅप लावतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यासोबतच संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने मंत्र्यांविरोधात अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेबाबत सहायक पोलिस निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेबाबत आमदार खडसे यांच्याविरुद्ध दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

