संशयित फसवणूक प्रकरणी युवकावर प्रतिबंधात्मक कारवाई


मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना विविध आमिषे दाखवून फसवणूक केल्याच्या संशयावरून मुक्ताईनगर पोलिसांनी एका युवकाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. सदर प्रकरणी बी.एन.एस.एस. कलम 128 अन्वये चॅप्टर केस रजिस्टर क्रमांक 17/2026 दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल अजय उदयभान खंडेराव (ब.क्र. 2657), मुक्ताईनगर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल कडू कोळी (वय 25, रा. पिंप्रीअकाराऊत, ता. मुक्ताईनगर) हा कोणताही ठोस व्यवसाय करत नसून 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पिंप्रीअकाराऊत शिवारात संशयास्पद हालचाली करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
चौकशीत संबंधित युवक व त्याच्या साथीदारांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांच्यावर नागरिकांना नागमणी, काळी हळद, सुलेमानी दगड, बनावट चलन आदींच्या आमिषाने बोलावून फसवणूक केल्याचा संशय बळावला आहे. तसेच हे संशयित भुरट्या चोरी करून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात अजय विनोद पिवटे (वय 24, रा. पिंप्रीअकाराऊत) व चेतन उर्फ शुभम बाळू पाटील (वय 22, रा. कोथळी, ता. मुक्ताईनगर) यांच्यावरही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सदर युवकावर वेळेत प्रतिबंधात्मक कारवाई न केल्यास भविष्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे, दरोड्यासारख्या घटनांची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे संबंधिताविरुद्ध पुढील दोन वर्षांसाठी दोन प्रतिष्ठित व्यक्तींच्या जामीनावर व जातमुचलका घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, बी.एन.एस.एस. कलम 135 अन्वये अंतरिम बॉन्ड घेण्याचीही कार्यवाही प्रस्तावित आहे.

