भरधाव बोलेरोची एसटी बसला धडक तीन प्रवासी जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : तालुक्यातील बोरखेडा बु. गावाजवळ भरधाव वेगातील बोलेरो पिकअपने एसटी बसला जोरदार धडक दिल्याने तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 28) सकाळी घडली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील विजय दिनकर अवचारे (वय 48) हे एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत असून दि. 28 एप्रिल रोजी पहाटे पाचोरा येथून नाशिककडे जाणारी (क्र. MH 14 BT 4894) बस घेऊन निघाले होते. सकाळी सुमारे 6.20 वाजता बोरखेडा बु. बसस्टँडजवळील रायगड हॉटेल परिसरात चाळीसगावकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअपने भरधाव वेगात येत बसच्या ड्रायव्हर साइडच्या चौथ्या खिडकीजवळ समोरून जोरदार धडक दिली.धडक दिल्यानंतर संबंधित बोलेरो चालक घटनास्थळावरून भडगावच्या दिशेने पसार झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वाहनाचा अपूर्ण क्रमांक “1980” इतकाच समजला आहे.या अपघातात बसमधील सुमित्रा जयंतीलाल करंजे (वय 46, जळगाव), प्रमीला कैलास देवरे (रा. चाळीसगाव) आणि सीमा किशोर भावसार (वय 35, भडगाव) या प्रवाशांना दुखापत झाली. जखमींना चालक व वाहक तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने खासगी वाहनातून चाळीसगाव येथील देवरे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातात एसटी बसचेही नुकसान झाले असून अज्ञात बोलेरो चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत अपघात घडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

