Sunday, June 14, 2026
Homeगुन्हामध्यरात्री थरार! हॉटेल चालकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल 

मध्यरात्री थरार! हॉटेल चालकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल 

मध्यरात्री थरार! हॉटेल चालकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

 

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरात मागील वादाच्या रागातून हॉटेल चालकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात हॉटेल चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, धुळे रस्त्यावरील राणीपार्क हॉटेलचे संचालक प्रफुल्ल बापुसाहेब देशमुख हे १८ मे रोजी मध्यरात्री हॉटेल बंद करून उत्तम टॉवर परिसरातील आपल्या निवासस्थानी जात होते. घराबाहेर वाहन उभे करून खाली उतरताच दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.यावेळी संशयित हर्षल दीपक राठोड (रा. जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून धारदार शस्त्राने देशमुख यांच्या दंड, उजव्या खांद्यावर तसेच पाठीवर वार केल्याचे सांगितले जात आहे. हल्ला चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांनाही गंभीर दुखापत झाली.देशमुख यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर त्यांचे भाऊ व मित्र घटनास्थळी धावून आले. त्यांना पाहताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.गंभीर जखमी अवस्थेत प्रफुल्ल देशमुख यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात भेट देत जखमीची विचारपूस केली तसेच घटनास्थळाची पाहणी केली.

 

या प्रकरणी प्रफुल्ल देशमुख यांच्या फिर्यादीवरून हर्षल राठोड व त्याच्या साथीदाराविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, दुखापत करणे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या