१ कोटी ६१ लाखांच्या फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी चाळीसगावातून ताब्यात

चाळीसगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी आहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीस चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेत आर्थिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन केले.मिळालेल्या माहितीनुसार, “अँसीटेक सोल्युशन्स” या फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून फिर्यादी अवधुत विनायक केदार (रा. शेवगाव, जि. आहिल्यानगर) यांची १ कोटी ६१ लाख ४२ हजार ९०० रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.या गुन्ह्यातील फरार आरोपी सागर सुधाकर पवार (वय ३५, रा. डोणगाव, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) हा चाळीसगाव शहर हद्दीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव व त्यांचे पथक चाळीसगाव येथे दाखल झाले.पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अशोक नाना पाटील व आशुतोष सोनवणे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. आरोपी हा मोतीबाग नगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ आपल्या आत्याच्या घरी वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.यानंतर आरोपीस आर्थिक गुन्हे शाखा, आहिल्यानगरच्या पथकाच्या स्वाधीन करण्यात आले. या कारवाईबद्दल चाळीसगाव शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.

