जनावरांच्या हाडांची अवैध वाहतूक उघड

पोलिसांची कारवाई; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
चाळीसगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील पातोंडा गावाजवळ चाळीसगाव-भडगाव रोडवर पोलिसांनी जनावरांच्या हाडे व शिंगांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी रात्री 8.19 वाजेच्या सुमारास पोलिसांना संशयास्पद मालवाहतुकीची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पातोंडा गावाजवळ सापळा रचून टाटा कंपनीची ACE मालवाहू गाडी (क्र. MH 04 FJ 6298) अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये 32 प्लास्टिक गोण्यांमध्ये भरलेली सुमारे 620 किलो वजनाची जनावरांची हाडे व शिंगे आढळून आली.या प्रकरणी हुजेफ खान अब्दुल रहीम खान (वय 25, रा. छोटी गुजरी चौधरीवाडा, चाळीसगाव) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5(क), 9(अ) तसेच महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम कलम 66/192(A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी वाहनासह सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पोहेकॉ नितीन आगोणे करीत आहेत.

