अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून लाखोंची खंडणी; यश जैनचा जामीन अर्ज फेटाळला

जळगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश; तपासासाठी कोठडी आवश्यक असल्याचे निरीक्षण
चाळीसगाव, खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीकडून लाखो रुपयांची रोकड व सोन्याची खंडणी उकळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी यश महेंद्रकुमार जैन याचा जामीन अर्ज जळगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासाची आवश्यकता लक्षात घेऊन न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, आरोपीने पीडित तरुणीशी मैत्री निर्माण करून व्हिडीओ कॉलद्वारे तिचे खाजगी फोटो व व्हिडीओ मिळवले. त्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. आरोपीने पीडितेकडून सुमारे ८ लाख १२ हजार रुपये तसेच जवळपास ९० ग्रॅम सोन्याचे दागिने उकळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने न्यायालयात मांडले की, तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये ३३ महिलांचे फोटो आढळून आले असून, पीडितेला धमकावणारे आणि अश्लील स्वरूपाचे संदेश व चॅट्सही समोर आले आहेत. तसेच आरोपीने काही व्हॉट्सअॅप चॅट्स डिलीट केल्याचेही तपासातून उघड झाले असल्याचा दावा करण्यात आला.
पीडितेच्या वतीने ऍडव्होकेट . सय्यद रफीक अहमद यांनी न्यायालयात सविस्तर युक्तिवाद करत तपास अद्याप सुरू असून अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होणे बाकी असल्याचे सांगितले. आरोपीच्या इतर इलेक्ट्रॉनिक खात्यांचा शोध, व्हॉइस सॅम्पल तपासणी तसेच आर्थिक व्यवहारांची पडताळणी करणे आवश्यक असल्याने जामीन मंजूर करू नये, अशी मागणी त्यांनी केली.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, उपलब्ध प्राथमिक पुराव्यांवरून आरोपीने फोटो व व्हिडीओच्या आधारे पीडितेला धमकावत पैशांची मागणी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तसेच तपासाच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर तांत्रिक बाबींची सखोल चौकशी आवश्यक असल्याने आरोपीस जामीन देणे योग्य ठरणार नाही.
यामुळे न्यायालयाने यश महेंद्रकुमार जैन याचा जामीन अर्ज फेटाळून लावत तपास यंत्रणेला पुढील चौकशी सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

