दारूच्या पार्टीतून वाद तरुणावर कटरने सपासप वार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील तरवाडे येथे दारू पिण्याच्या वेळी झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका तरुणावर कटरने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण सपकाळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.याबाबत किरण संभाजी बागुल (वय २७, रा. तरवाडे पेठ, ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास ते जलाराम कोळी व पिंटू नारायण चौधरी यांच्यासोबत गावातील शेखलाल वजीर गाधीवाले यांच्या घरामागील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी जलाराम कोळी याने शिवीगाळ केल्याने संतापलेल्या किरण बागुल यांनी त्याला चापट मारली. या घटनेचा राग आल्याने जलाराम कोळी याने खिशातून धारदार कटर काढून किरण बागुल यांच्या पाठीवर वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.कटर हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना फिर्यादीच्या उजव्या हाताच्या बोटालाही दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने पाठीवर सलग सात ते आठ वार केल्याने किरण बागुल गंभीर जखमी झाले. आरडाओरड ऐकून घटनास्थळी आलेल्या हरिमामा तसेच पिंटू नारायण चौधरी यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले.जखमी अवस्थेत घरी पोहोचल्यानंतर किरण बागुल यांनी घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर ते आई-वडील व नातेवाईकांसह जलाराम कोळी यांच्या घरासमोर जाब विचारण्यासाठी गेले असता, तेथे जलाराम कोळी, त्याचा भाऊ माधव कोळी व भाचा गणेश बापू कोळी यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच पुन्हा घरासमोर आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.दरम्यान, जखमी किरण बागुल यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथे दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात जलाराम कोळी, माधव कोळी व गणेश बापू कोळी (सर्व रा. तरवाडे, ता. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण सपकाळे करीत आहेत.

