आरोग्यदूत विक्की खोकरे यांनी वाचवले “वधूपित्याचे” प्राण;

शिर्डीत यशस्वी बायपास शस्त्रक्रिया
जळगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी देव दगडात नसून तो माणसात असतो, याची प्रचिती पुन्हा एकदा आली असून, शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी तथा आरोग्यदूत विक्की फकिरा खोकरे यांनी आपल्या सेवाभावी कार्यातून एका कुटुंबाला मोठ्या संकटातून बाहेर काढले आहे.
अकोला जिल्ह्यातील पातूर येथील रमेश सारवान (वय ५५) यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. तपासणीनंतर त्यांच्या हृदयातील अनेक महत्त्वाच्या रक्तवाहिन्या बंद झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने ओपन हार्ट बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र, शस्त्रक्रियेसाठी ४ ते ५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्यातच त्यांच्या मुलीचे लग्न अवघ्या दोन महिन्यांवर आल्याने सारवान कुटुंब मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडले.
मदतीच्या शोधात असताना एका रुग्णामार्फत त्यांना आरोग्यदूत विक्की खोकरे यांचा संपर्क मिळाला. त्यांनी तत्काळ सर्व वैद्यकीय अहवाल व्हॉट्सॲपद्वारे मागवून घेतले आणि रमेश सारवान यांना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मार्गदर्शन केले. स्वतःही शिर्डी येथे पोहोचून त्यांनी तेथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संदीप देवरे यांच्याशी समन्वय साधला.
विक्की खोकरे यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळवून दिला. त्यानंतर हृदयरोग शल्यविशारद डॉ. महादेव मिस्त्री यांनी रमेश सारवान यांच्यावर जोखमीची बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. विशेष म्हणजे, ही शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करण्यात आली.
उपचारानंतर रमेश सारवान यांना नवजीवन मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. एका वडिलांना आपल्या कन्येचे कन्यादान करण्याचे सौभाग्य लाभल्याची भावना व्यक्त करत कुटुंबीयांनी विक्की खोकरे यांना मनःपूर्वक आशीर्वाद दिले.गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देत त्यांच्यासाठी सातत्याने धावून जाणारे आरोग्यदूत विक्की खोकरे यांची ही निःस्वार्थ सेवा अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेली कुटुंबे पुन्हा उभी राहत आहेत.

