Monday, June 29, 2026
Homeगुन्हाजलतरण तलावातील धक्कादायक वाद; दोन्ही प्रमुख आरोपींना अटक! बातमीचा राग आणि भ्रष्टाचाराच्या...

जलतरण तलावातील धक्कादायक वाद; दोन्ही प्रमुख आरोपींना अटक! बातमीचा राग आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारीतून वाद?

जलतरण तलावातील धक्कादायक वाद; दोन्ही प्रमुख आरोपींना अटक! बातमीचा राग आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारीतून वाद?

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – चाळीसगाव शहरातील अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव येथे झालेल्या वादाच्या प्रकरणाला गंभीर वळण लागले असून, दोन्ही पक्षांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील दोन्ही प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास जलतरण तलाव परिसरात किसनराव यशवंत जोर्वेकर (रा. साईधाम, भडगाव रोड, चाळीसगाव) आणि श्याम उर्फ अण्णा नारायण गवळी (रा. अभिनव शाळेसमोर, भडगाव रोड, चाळीसगाव) यांच्यात वाद झाला होता. या घटनेनंतर दोघांनीही एकमेकांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या.तक्रारींच्या चौकशीनंतर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत गुन्हा क्रमांक ३१३/२०२६ आणि ३१४/२०२६ असे स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.किसनराव जोर्वेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत, पूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा राग मनात धरून श्याम गवळी यांनी जलतरण तलावात हात-पाय पकडून खोल पाण्यात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.तर श्याम उर्फ अण्णा गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीत, ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार केल्याच्या कारणावरून किसनराव जोर्वेकर यांनी जलतरण तलावात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच, घरी परतत असताना महेंद्र सूर्यवंशी आणि बबलू अहिरे यांनी रस्ता अडवून शिवीगाळ करत दमदाटी केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकरणात किसनराव जोर्वेकर यांच्या फिर्यादीवरून श्याम गवळी यांच्याविरुद्ध, तर श्याम गवळी यांच्या फिर्यादीवरून किसनराव जोर्वेकर, महेंद्र सूर्यवंशी आणि बबलू अहिरे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीसांनी किसनराव जोर्वेकर आणि श्याम उर्फ अण्णा गवळी या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या