जुने जळगावात सात महिन्यांचे मृत अर्भक आढळले; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील जुने जळगाव परिसरातील आंबेडकर नगरातील एका अरुंद गल्लीत मंगळवारी (दि. ११) सकाळी सात महिन्यांचे मृत पुरुष अर्भक रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने अर्भक तेथे टाकून पलायन केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आंबेडकर नगरातील रहिवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्यासह पोलीस अंमलदार विजय खैरे आणि महिला पोलीस अंमलदार काजल सोनवणे घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले तसेच पंचनामा केला. त्यानंतर मृत अर्भक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अर्भकाला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातील गल्लीत पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने अर्भक तेथे फेकून दिले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अर्भक तेथे कोण आणि कोणत्या कारणाने आणून सोडले, याचा तपास शनिपेठ पोलीस करीत आहेत.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरील पुरावे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

