पोलिसांचा गुटखा तस्करीवर छापा; ओमनीसह ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त !


चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील मेहुणबारे पोलिसांनी दहिवद येथील बसस्थानकावर कारवाई करत प्रतिबंधित विमल पानमसाला व तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली ओमनी, मोबाईल आणि प्रतिबंधित पदार्थ असा एकूण ४ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी मेहुणबारे येथील हितेश अनिल अहिरराव (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मेहुणबारे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास शिरोळ यांच्यासह पोलिस पथक परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी दहिवद बसस्थानकावर एमएच १८ एस ६६२ क्रमांकाची ओमनी संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी वाहनातील मालाबाबत चालकाकडे विचारणा केली असता त्याने किराणा माल असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने वाहन चालकासह मेहुणबारे पोलिस ठाण्यात आणून वाहनाची झडती घेण्यात आली. यावेळी वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पानमसाला व तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला.चौकशीदरम्यान हितेश अहिरराव याने हा प्रतिबंधित माल धुळे येथील बिलाल नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. विक्रीच्या उद्देशाने विनापरवाना प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत सुमारे ३ लाख ३२ हजार रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला व तंबाखू, १ लाख रुपयांची ओमनी आणि १५ हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला. पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले करीत आहेत.

