शहरातील किराणा दुकानावर कारवाई; ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त !


चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड परिसरातील मे. विनोद किराणा स्टोअर्सवर कारवाई करून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा ६८ हजार १८ रुपयांचा साठा जप्त केला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर १७ सप्टेंबर रोजी पथकाने हिरापूर रोडवरील संबंधित किराणा दुकानाची तपासणी केली. पंच आणि चाळीसगाव शहर पोलिसांच्या उपस्थितीत दुकानाची झडती घेतली असता किराणा मालासोबत प्रतिबंधित सुगंधित पानमसाला व तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले.पथकाने विविध १३ प्रकारच्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा ताब्यात घेतला. त्यातील प्रातिनिधिक नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित साठा पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.तपासादरम्यान दुकानाचे संचालक विनोद सुदाम वाणी (५१) असल्याचे समोर आले. प्रतिबंधित माल कोठून आणला, याबाबत विचारणा केली असता समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास चाळीसगाव शहर पोलिस करीत आहेत.

