Friday, October 9, 2026
Homeजळगावतापी नदीत साखळीने बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह; आत्महत्या की घातपात?

तापी नदीत साखळीने बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह; आत्महत्या की घातपात?

तापी नदीत साखळीने बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह; आत्महत्या की घातपात?

नरडाणा परिसरात खळबळ; पोलिसांकडून तपास सुरू

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी आणि सध्या एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे वास्तव्यास असलेल्या तरुण दाम्पत्याचा तापी नदीत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. श्याम हरी पाटील (वय २८) आणि त्यांची पत्नी सपना पाटील (वय २०) यांचे मृतदेह ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा शिवारातील तापी नदीत आढळून आले. दोघांचे पाय लोखंडी साखळीने एकमेकांना बांधून त्याला कुलूप लावण्यात आलेले असल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पायांना साखळी अन् कुलूप

घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कापडणीस आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी श्याम यांचा डावा पाय आणि सपना यांचा उजवा पाय लोखंडी साखळीने एकत्र बांधलेला असून त्याला मोठे कुलूप लावलेले आढळले. त्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

प्रेमविवाहानंतर उत्राण येथे वास्तव्य श्याम पाटील हे काही वर्षांपूर्वी पाडळसरे गाव सोडून कामानिमित्त उत्राण येथे गेले होते. तेथे ते शेतीची कामे आणि ट्रॅक्टर चालविण्याचे काम करत होते. याच परिसरात आपल्या बहिणीकडे राहणाऱ्या सपनाशी त्यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि पुढे दोघांनी प्रेमविवाह केला.मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या तीन ते चार दिवसांपूर्वी हे दाम्पत्य बाहेरगावी गेले होते. त्यानंतर अचानक दोघांचे मृतदेह नदीत आढळल्याने त्यांच्या मृत्यूमागील कारणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आत्महत्या की घातपात?

दोघांनी एकत्र आत्महत्या केली की त्यांचा घातपात करण्यात आला, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि अन्य तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.या प्रकरणाचा पुढील तपास नरडाणा पोलीस करत असून, मृत्यूमागील गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या