तक्रारदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न; तहसील कार्यालयात खळबळ !
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीची मागणी; प्रांताधिकारी यांच्यासमोर घडला प्रकार !
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – आरटीई प्रवेश प्रक्रियेतील कथित घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आलेल्या पवन असलकर यांनी तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना १९ रोजी सोमवारी घडली. विभागीय लोकशाही दिनानिमित्त प्रांताधिकारी प्रमोद हिले कार्यालयात आले असताना हा प्रकार घडल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रांताधिकारी प्रमोद हिले हे विभागीय लोकशाही दिनानिमित्त तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत आले होते. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेले तक्रारदार पवन असलकर यांनी बाटलीतून स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतले. हा प्रकार लक्षात येताच प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.आरटीई प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

पवन असलकर यांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेत कथित घोटाळा झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीवर शिक्षण विभागाने काय कार्यवाही केली आहे, तसेच चौकशी सुरू आहे किंवा नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.दोन दिवसांपूर्वी चर्चा झाल्याची प्रांताधिकाऱ्यांची माहिती या घटनेनंतर प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी सांगितले की, संबंधित युवकासोबत दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. त्याच्या मागण्यांबाबतही संवाद साधण्यात आला होता. मात्र, तो आपल्या भूमिकेवर ठाम होता आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकण्यास तयार नव्हता, असे हिले यांनी सांगितले.

दरम्यान, संबंधित तक्रार शिक्षण विभागाशी निगडित असल्याचेही प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी स्पष्ट केले. आरटीई प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी आणि तक्रारदाराच्या मागण्यांवर प्रशासनाकडून कोणती कार्यवाही होते, याकडे आता लक्ष लागले आहे.यावेळी प्रमोद हिले यांनी माध्यमाना दिलेल्या प्रतिक्रिया

