Saturday, October 31, 2026
Homeजळगावरजनी सावकारे यांचे जिल्हा बँक संचालक पदी बिनविरोध निवड

रजनी सावकारे यांचे जिल्हा बँक संचालक पदी बिनविरोध निवड

रजनी सावकारे यांचे जिल्हा बँक संचालक पदी बिनविरोध निवड

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ सोसायटी मतदारसंघातून भाजपाचे महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. संजयभाऊ सावकारे यांच्या सौभाग्यवती तथा प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनीताई संजय सावकारे यांची जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालिका म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे भुसावळसह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाची आर्थिक संस्था असून, शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात बँकेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अशा महत्त्वपूर्ण संस्थेच्या संचालकपदी सौ. रजनीताई सावकारे यांची बिनविरोध निवड होणे ही भुसावळ तालुक्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब मानली जात आहे.

सौ. रजनीताई सावकारे या प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.

त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव आणि नेतृत्वगुणांचा जिल्हा सहकारी बँकेच्या कामकाजात निश्चितच उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे सहकार क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होण्यासही मदत होणार आहे.

या निवडीबद्दल वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे यांचे समर्थक, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे आणि नागरिकांनी सौ. रजनीताई सावकारे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक व सहकार क्षेत्रातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

सौ. रजनीताई सावकारे यांच्या या निवडीमुळे भुसावळच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या