भुसावळमध्ये खळबळ जनक प्रकार तरुणीवर अतिप्रसंग, आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी
कार्यालयात बोलावून जबरदस्ती केल्याचा आरोप; फॉरेन्सिक तपासणीसह पोलिसांचा तपास गतीने
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : शहरातील एका २२ वर्षीय तरुणीवर ओळखीच्या व्यक्तीने कार्यालयात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपी राजू गायकवाड याला तातडीने अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही टपाल विभागात कार्यरत असून ती भुसावळ येथे भाड्याच्या घरात राहत आहे. कामाच्या निमित्ताने तिची आरोपीशी पूर्वीपासून ओळख होती. दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी आरोपीने तिला बसस्थानक परिसरात बोलावून घेतले व चर्चा करण्याच्या बहाण्याने मुक्ताई कॉलनीतील स्वतःच्या कार्यालयात नेले. तेथे दरवाजा बंद करून आरोपीने तिच्याशी जबरदस्ती करत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने दुसऱ्या दिवशी

घरमालकाला घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या सल्ल्यानुसार तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपीला रात्रीच ताब्यात घेऊन अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन फॉरेन्सिक पथक व ठसे तज्ञांच्या मदतीने सखोल तपासणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले आहेत.
तसेच गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

