बापरे : पोलिस ठाण्यातच पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून धक्काबुक्की ; गुन्हा दाखल!

फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – फैजपूर येथील पोलिस ठाण्यातच पोलिसांशी धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ११:३० वाजता घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, भूषण प्रमोद भिरूड (वय २६) व धीरज विजय सोनवणे (वय २५, दोघे रा. फैजपूर) हे गुटखा खात पोलिस ठाण्यातील अंमलदाराच्या कक्षात गेले. तेथे त्यांनी गुटखा थुंकल्याने पोलिसांनी त्यांना विचारणा केली. यावेळी दोघांनी वाद घालत एका पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून धक्काबुक्की केली व शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यामुळे थोडावेळ तणाव झाला होता. या प्रकरणी हवालदार रुपेश पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिसउपनिरीक्षक रशीद तडवी करीत आहेत

