Sunday, June 21, 2026
Homeगुन्हा१० कोटींच्या कर्जाचे आमिष; प्रोसेसिंग फीच्या नावाखाली व्यापाऱ्याची ५ लाखांची फसवणूक !

१० कोटींच्या कर्जाचे आमिष; प्रोसेसिंग फीच्या नावाखाली व्यापाऱ्याची ५ लाखांची फसवणूक !

१० कोटींच्या कर्जाचे आमिष; प्रोसेसिंग फीच्या नावाखाली व्यापाऱ्याची ५ लाखांची फसवणूक !

 

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – राष्ट्रीयकृत बँकेतून कोणतेही शुल्क न घेता तब्बल १० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ५ लाख रुपये उकळून व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिक येथील एका व्यक्तीविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद हिरालाल चौधरी (रा. शास्त्रीनगर, गणपती मंदिराजवळ, चाळीसगाव) यांचा चायनिज खाद्यपदार्थांचा व्यवसाय असून व्यवसाय विस्तारासाठी त्यांनी मोठ्या कर्जाचा विचार केला होता. त्यावेळी त्यांची ओळख नाशिक येथील शांताराम मार्तंड संदान पाटील याच्याशी झाली.शांताराम पाटील याने राष्ट्रीयकृत बँकेतून कोणतेही शुल्क न घेता १० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देत गोविंद चौधरी यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार चौधरी यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र त्यानंतर पाटील याने कर्ज प्रक्रियेसाठी प्रोसेसिंग फी म्हणून ५ लाख रुपये भरण्याची मागणी केली.कर्ज मंजुरीच्या आशेने गोविंद चौधरी यांनी पत्नीचे दागिने विकून १५ फेब्रुवारी २०२५ रोजी संबंधित रक्कम शांताराम पाटील यांच्या बँक खात्यात जमा केली. मात्र बराच कालावधी उलटल्यानंतरही कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे चौधरी यांनी कर्ज नको असल्याचे सांगत भरलेली रक्कम परत करण्याची मागणी केली.त्यानंतर शांताराम पाटील याने वारंवार टाळाटाळ करत “आज देतो, उद्या देतो” अशी उत्तरे दिली. तसेच “तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

 

दरम्यान, गोविंद चौधरी व त्यांचे काही मित्र नाशिक येथे आरोपीच्या निवासस्थानी गेले असता, आठ दिवसांत पैसे परत करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतरही रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.फिर्यादीच्या तक्रारीवरून शांताराम मार्तंड संदान पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या