भोकरातील दूषित पाणीपुरवठ्यावर संताप; ४८ तासांत उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भोकर (ता. जि. जळगाव) ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून होत असलेल्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. संपूर्ण गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.ग्रामपंचायतीचा प्लॉट एरिया (जुना व नवा), कोळीवाडा, गुजरवाडा, बडगुजरवाडा, चांभारवाडा, दर्जाचा वाडा, कुणबीवाडा, डेबुरवाडा, मांगवाडा तसेच हरिहर महाराज मंदिर परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाब, गॅस्ट्रो, टायफॉइड आणि काविळीसारख्या आजारांचा धोका वाढला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर ग्रामस्थांच्या आरोग्याची चिंता निर्माण झाली आहे. पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता होत नसणे, मुख्य जलवाहिनीत गळती होऊन गटाराचे पाणी मिसळत असण्याची शक्यता तसेच पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक टीसीएल किंवा ब्लिचिंग पावडरचा पुरेसा वापर होत नसल्याचा मुद्दाही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
शुद्ध पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत प्रशासनाने टँकरद्वारे किंवा अन्य माध्यमातून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची तात्पुरती व्यवस्था करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या प्रश्नावर पुढील २४ ते ४८ तासांत ठोस उपाययोजना न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच आवश्यक असल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असा इशारा प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला.यावेळी प्रभाकर कोळी, लोटन सोनवणे, एकनाथ सैंदाने, कविता सोनू बाविस्कर, चंद्रभागा कोळी, समाधान सपकाळे, धनराज वारडे, सुकदेव बाविस्कर यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

