Wednesday, September 16, 2026
Homeजळगावरामपेठेत हायमास्ट दिवे बंद; महिलांच्या सुरक्षेशी पालिका प्रशासनाचा खेळ !

रामपेठेत हायमास्ट दिवे बंद; महिलांच्या सुरक्षेशी पालिका प्रशासनाचा खेळ !

रामपेठेत हायमास्ट दिवे बंद; महिलांच्या सुरक्षेशी पालिका प्रशासनाचा खेळ !

महिनोन्‌महिने दिवे बंद, तक्रारी करूनही प्रशासन सुस्त; अंधारात शौचालयात जाण्यास महिलांना भीती

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                वरणगाव, ता. भुसावळ :
शहरातील रामपेठ परिसरात नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. नदीकाठच्या सार्वजनिक शौचालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील हायमास्ट पोलवरील काही दिवे अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी शौचालयाचा वापर करण्यासाठी जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रामपेठ परिसरात आठवडे बाजार भरत असल्याने या ठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, रात्रीच्या वेळी परिसरातील हायमास्ट दिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन अनुचित प्रकार घडण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विशेषतः महिलांना रात्री शौचालयात जाण्यासाठी भीती वाटत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
तक्रारी करूनही पालिका प्रशासनाला जाग कधी येणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. परिसरातील नागरिकांनी नगरसेवक तसेच नगरपरिषदेच्या विद्युत विभागाकडे तोंडी आणि लेखी तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
दरम्यान, रामपेठ परिसरातील हायमास्ट पोलवरील दिवाही अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. पालिकेकडून पथदिवे आणि हायमास्ट उभारण्यासाठी निधी खर्च केला जातो; मात्र दिवे बंद पडल्यानंतर त्यांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत प्रशासन झोपेतच राहणार का? एखादी अनुचित घटना घडल्यानंतरच पालिका प्रशासनाला जाग येणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नगरसेवकांनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष पाहणी करून बंद हायमास्ट दिवे तातडीने सुरू करावेत. तसेच विद्युत विभागाने रामपेठ परिसरातील सर्व बंद पथदिवे व हायमास्ट दिव्यांची तपासणी करून तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या