नीट पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वरणगावात महाविकास आघाडीचे आंदोलन

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव, ता भुसावळ
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा निषेध, दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या विरोधात तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्रातील मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वरणगाव महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी वरणगाव पोलीस स्टेशनवर निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक सपोनि अमित कुमार बागुल यांना निवेदन देऊन ते शासनाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली.
महाविकास आघाडीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, NEET परीक्षा पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ २० जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्यावर पोलिसांनी कथितपणे लाठीहल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगत, विद्यार्थ्यांचा लोकशाही मार्गाने सुरू असलेला आवाज दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही करण्यात आला.
महाविकास आघाडीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परीक्षा व्यवस्थेतील कथित अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
तसेच राज्यातील शिक्षण व परीक्षांमधील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसे यांनीही पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय, जंतर-मंतर येथील कथित लाठीहल्ल्यास जबाबदार असलेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच NEET पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करत विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मागण्यांसाठी तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन केले. निवेदनाची गंभीर दखल घेऊन ते संबंधित प्रशासनाकडे तातडीने पाठवावे, अशी मागणीही पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.
यावेळी प्रतिभा तावडे ,रमेश पाटील , दीपक मराठे ,मनोज देशमुख, डॉ राहुल भोईटे ,डॉ अहेसान ,कुलदीप देशमुख ,राहुल जोहरे,पंकज पाटील ,अशपाक काझी, नरेंद्र इंगळे , शाहरुख खान , पी एस भैसे , राहुल सोनवणे , जितेंद्र तावडे , नाना चौधरी , सुनील भोई संजय कोळी , सुनील अहिरराव , मनोज अग्रवाल, शेख हनीप ,शेख समीर , निर्मला जवरे , अनिता निकम , विश्रांती पवार , एस डी कापसे , पूजा भिलावे , अनिता लोखंडे , अजहर अली , चंद्रकांत शर्मा , तेजस चौधरी आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व विद्यार्थ्यी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

