राजकीय पक्षाच्या तंबूत बसून BLO कडून SIRचे काम; मनसेकडून चौकशीची मागणी

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
मतदार यादी पुनरीक्षणाच्या (SIR) कामासाठी भुसावळ शहरात नियुक्त करण्यात आलेले बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) हे घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करण्याऐवजी राजकीय पक्षांनी उभारलेल्या तंबूत बसून नागरिकांना तेथे बोलावून काम करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित BLO यांना राजकीय पक्षांच्या तंबूतून हटवून नियमानुसार घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष दीपक आत्माराम सोनवणे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, मतदार यादी पुनरीक्षणाचे काम हे शासकीय स्वरूपाचे असून, BLO यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या तंबूत बसून हे काम करणे योग्य नाही. अशा पद्धतीने काम केल्यास मतदारांची खरी व अचूक माहिती संकलित होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच मतदारांची माहिती विशिष्ट राजकीय पक्षाकडे जमा होण्याची शक्यता असून, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते.
निवडणूक प्रक्रियेतील BLO यांची भूमिका निष्पक्ष आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित प्रकाराची चौकशी करून BLO यांना राजकीय पक्षांच्या तंबूतून हटवावे आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन पारदर्शक पद्धतीने माहिती संकलित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
दरम्यान, प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने हे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत नायब तहसीलदार यांनी BLO हे सर्व मतदारांच्या घरीदेखील भेट देणार असून, या प्रक्रियेत एकही नागरिक वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
यावेळी मनसे शहराध्यक्ष दीपक आत्माराम सोनवणे यांनी मतदारांनी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने SIR फॉर्म भरता यावा, यासाठी ECINET अॅपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रणय भागवत, प्रतीक भंगाळे, विशाल कोळी, विलास कोळी, दशरथ सपकाळे, सुशील मोरे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

