Wednesday, July 22, 2026
Homeआंदोलनभर पावसात भुसावळमध्ये उपवर्गीकरणाविरोधात एल्गार; प्रांत कार्यालयावर विराट महामोर्चा, शासनाला निवेदन

भर पावसात भुसावळमध्ये उपवर्गीकरणाविरोधात एल्गार; प्रांत कार्यालयावर विराट महामोर्चा, शासनाला निवेदन

भर पावसात भुसावळमध्ये उपवर्गीकरणाविरोधात एल्गार; प्रांत कार्यालयावर विराट महामोर्चा, शासनाला निवेदन
भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने बुधवारी भुसावळ शहरात भर पावसात विराट महामोर्चा काढण्यात आला.
नाहाटा महाविद्यालय परिसरातून निघालेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून प्रांत कार्यालयावर धडकला. पावसाची पर्वा न करता हजारो नागरिक, महिला, युवक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि आंबेडकरी अनुयायांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी जोरदार एल्गार पुकारला.

 

Oplus_131072

महामोर्चादरम्यान “संविधान बचाव”, “आरक्षण वाचवा”, “उपवर्गीकरण रद्द करा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलकांच्या हातात निळे झेंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र आणि विविध मागण्यांचे फलक होते. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या मोर्चामुळे काही काळ शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला.

प्रांत कार्यालयात पोहोचल्यानंतर कृती समितीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना शासनाच्या नावे सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची मुभा दिली असली, तरी ते बंधनकारक केलेले नाही. महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती लक्षात घेता उपवर्गीकरणाची कोणतीही आवश्यकता नाही. अनुसूचित जातींमध्ये परस्पर मागासलेपण सिद्ध करणारा कोणताही अधिकृत अभ्यास किंवा आकडेवारी उपलब्ध नसल्याने उपवर्गीकरण करणे सामाजिक न्यायाच्या तत्त्वाविरोधात ठरेल.

 

Oplus_131072

कृती समितीने शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्याही केल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातींच्या आरक्षणात कोणतेही उपवर्गीकरण करू नये, खाजगी क्षेत्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची कायदेशीर तरतूद करावी, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे प्रमाण वाढवावे, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व कल्याणकारी योजनांचा निधी वाढवून तो अन्य योजनांकडे वळवू नये, तसेच सर्व शासकीय विभागांतील अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांचा अनुशेष विशेष भरती मोहिमेद्वारे तातडीने भरावा, अशा मागण्यांचा समावेश होता.

याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि संविधानाने दिलेले आरक्षणाचे अधिकार अबाधित ठेवण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. सामाजिक न्याय, समान संधी आणि घटनात्मक प्रतिनिधित्व अधिक बळकट करण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली.

 

Oplus_131072

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रमुख चौकांमध्ये वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

या आंदोलनात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे राजू सूर्यवंशी, गणेश सपकाळे, बाळा पवार, जगन सोनवणे, शांताराम जाधव, बाळा मोरे, सुधीर जंजाळे, उल्हास पगारे,   अनुप खोब्रागडे माजी नगरसेवक रवींद्र सपकाळे  बाळा सोनवणे, सुमंगल अहिरे, रवींद्र निकम, मिलींद मेढे ,संदीप साबळे, ॲड. धनराज मगर, बाळू सोनावणे, वाल्मिक देहाडे, मुन्ना सोनावणे, विजय सावळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भर पावसात पार पडलेल्या या विराट महामोर्चाने भुसावळमध्ये सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर अनुसूचित जाती समाजाची एकजूट आणि संविधानावरील दृढ विश्वास अधोरेखित केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या