मित्र परिवारातर्फे सिद्धेश्वरनगर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप. वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेऊन व सामाजीक बाधीलकी जपत शिक्षण हेच खरे आभूषण हा संदेश देत वरणगाव मित्र परिवाराने सिद्धेश्वरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सलग पाचव्या वर्षी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. डॉ. शांतनू साहू व चंद्रकात बढेसरासह विविध मान्यवरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनासह झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वरणगाव मित्र परिवाराच्या वतीने सिद्धेश्वरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शुक्रवार ( ता. २४ ) रोजी मोफत शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सलग पाचव्या वर्षी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि मान्यवरांनी दिलेला प्रेरणादायी संदेश यामुळे संपूर्ण परिसरात व शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात झालेल्या शानदार कार्यक्रमात शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ येथील सुप्रसिद्ध नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शांतनू साहू यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
“मीदेखील अशाच एका साध्या शाळेत शिक्षण घेतले आहे. आज तुम्ही ज्या बाकांवर बसले आहात, त्याचप्रमाणे मीही कधीकाळी बसत होतो. त्या वेळी मान्यवरांचे प्रेरणादायी विचार ऐकून आम्हाला मोठी प्रेरणा मिळायची. आज तुम्ही मन लावून शिक्षण घेतले, तर उद्या समाजात विविध क्षेत्रांत मोठे यश मिळवून इतरांसाठी प्रेरणास्थान बनाल,” असे भावनिक आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल डॉ. पी. व्ही. पाटील व वरणगाव मित्र परिवार यांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी चंद्रकांत बढे सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य उपयोग करून शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन केले. “आमच्या शालेय जीवनात अशा सुविधा नव्हत्या. आज तुम्हाला दप्तर, पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल , रबर , शॉपनर , जेवण डब्बा , पाण्याची बाटली यांसारखे साहित्य सहज उपलब्ध होत आहे. त्याचा सदुपयोग करा आणि जीवनात मोठे ध्येय गाठा, असा संदेश देत विद्यार्थ्यांना संबोधित केले.
सिद्धेश्वरनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या निसर्गरम्य परिसराचे कौतुक करत त्यांनी ही शाळा शहरातील अनेक नामांकित शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण देत असल्याचे सांगितले. चांगले वातावरण, समर्पित शिक्षक आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.



गेल्या पाच वर्षांपासून वरणगाव मित्र परिवार सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करत आहे. “शिक्षणाची गोडी लावूया… उज्ज्वल भविष्य घडवूया” या संकल्पनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी ऊर्जा देणारा ठरत आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, शिक्षक आणि नागरिक यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम वर्षागणिक अधिक व्यापक होत असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा संदेश देत आहे.
या कार्यक्रमासाठी चंद्रकांत बढे, राजेंद्र चौधरी, संभाजीराव देशमुख, पुरुषोत्तम पवार, डॉ. शांतनू साहू, डॉ. बी. व्ही. पाटील, दिनकर सोनवणे, किरण नवले, किरण पाटील, प्रशांत जैसवाल, संदीप वाघ, किशोर चौधरी, किशोर सोनार, कलीम खाटीक, संजय चौधरी, सुहास सोनार, सचिन पंचबुद्धे, भैयासाहेब देशमुख, दिनेश रुणवाल, वैभव महाजन, प्रदीप झोपे आदींनी आर्थिक सहकार्य केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरणगाव मित्र परिवाराचे राजू खडसे, संजय माळी, रवि तोताणी, शेख जावेद युसुफ, सिराज मलिक, सचिन माळी, ज्ञानेश्वर चौधरी, रविंद्र पाटील, संजय निबाळकर, गणेश माळी आणि विकास सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती आवचारे यांनी केले.यावेळी मुख्याध्यापक प्रमोद खरे तसेच अनिल देशपांडे, शुभांगी सपकाळ, रमाकांत पाटील, विनय भोगे, शारदा सुरवाडे, सु. रा. हेरोळ आणि उज्वला धांडे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.

