Friday, July 31, 2026
Homeजळगावफुलगाव रेल्वे पुलाखाली पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे हाल; शेतकरी, विद्यार्थी व वाहनधारक...

फुलगाव रेल्वे पुलाखाली पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे हाल; शेतकरी, विद्यार्थी व वाहनधारक त्रस्त, रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप

फुलगाव रेल्वे पुलाखाली पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे हाल; शेतकरी, विद्यार्थी व वाहनधारक त्रस्त, रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             वरणगाव ता.भुसावळ :
वरणगाव-दीपनगर परिसरातून कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. या रेल्वे मार्गावरील फुलगाव रेल्वे पुलाखाली मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात दोन ते तीन फूट पाणी साचत आहे. त्यामुळे हा मार्ग पूर्णपणे धोकादायक बनला असून शेतकरी, विद्यार्थी, वाहनधारक आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

फुलगाव रेल्वे पुलाखालून जाडगाव, मन्यारखेडा, साक्री तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिकांचा दररोज संपर्क होत असतो. बाजारपेठ, शासकीय कार्यालये, रुग्णालये तसेच विविध कामांसाठी वरणगाव शहरात ये-जा करण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.पुलाखालील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत असून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात हा मार्ग अधिकच धोकादायक ठरत आहे.

या मार्गाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वरणगाव व फुलगाव शिवारात अनेक शेतकऱ्यांची शेती असून शेतीकामासाठी, पिकांची वाहतूक करण्यासाठी आणि कृषी साहित्य ने-आण करण्यासाठी त्यांना याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र पुलाखाली पाणी साचल्याने अनेकदा त्यांना दोन ते तीन किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत असून वेळ आणि इंधनाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.याच मार्गाने वरणगावातील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी दररोज ये-जा करतात. पाण्यातून मार्ग काढत शाळेत जाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
वाहनधारकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फुलगाव रेल्वे पुलाखालून मार्ग बंद झाल्यास महामार्गावर जाण्यासाठी वाहनचालकांना फुलगाव उड्डाणपुलावरून सुमारे दोन किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागतो. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत असून इंधन खर्चही वाढत आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे पुलाखालील खड्डे बुजविणे, रस्ता दुरुस्त करणे आणि पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
फुलगाव रेल्वे पुलाखाली पडलेले खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच पाणी साचणार नाही, अशी कायमस्वरूपी निचरा व्यवस्था उभारावी, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित रेल्वे प्रशासनाची राहील, असा इशारा शेतकरी, विद्यार्थी, वाहनधारक आणि ग्रामस्थांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या