Monday, August 3, 2026
Homeजळगावमहसूल कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणात मिश्कील फटकेबाजी

महसूल कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणात मिश्कील फटकेबाजी

महसूल कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणात मिश्कील फटकेबाजी

जळगाव :  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            महसूल विभाग हा शासनाचा सर्वाधिक लोकाभिमुख विभाग असून नैसर्गिक आपत्तीपासून विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक ठिकाणी महसूल कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महसूल दिनानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्यात त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करताना आपल्या खास विनोदी शैलीत अनेक राजकीय आणि प्रशासकीय संदर्भांवर भाष्य केले. त्यांच्या भाषणामुळे सभागृहात अनेकदा हास्यकल्लोळ उसळला.

भाषणाच्या सुरुवातीलाच विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांचा उल्लेख करत, “वरच्या सभागृहाचे सदस्य नेहमीच आपल्या डोक्यावर असतात,” अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या शिस्तबद्ध व काटेकोर कामकाजाचेही त्यांनी कौतुक केले.

सामान्य नागरिकाला तहसील किंवा तलाठी कार्यालयात आल्यानंतर आपले काम होईल, असा विश्वास असतो. हा विश्वास तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून जपला आहे, असे सांगत त्यांनी “जिल्हाधिकाऱ्यांचे खरे भांडवल तलाठी आहेत, तर आमचे भांडवल कार्यकर्ते आहेत,” असे नमूद केले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे अंतिम ध्येय समाजसेवाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या जबाबदाऱ्यांमधील फरक अधोरेखित करताना ते म्हणाले की, अधिकाऱ्यांना सेवेत स्थैर्य असते; मात्र लोकप्रतिनिधींना प्रत्येक निवडणुकीत जनतेच्या विश्वासाची परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा समतोल राखणे आवश्यक असते.

आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक या जळगावच्या जिल्हाधिकारी असताना ते पंचायत समिती सदस्य होते. त्या काळातील अनुभव आणि माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून प्रशासनातील समतोल राखण्याचे धडे मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

पाणीपुरवठा विभागाच्या कामांचा उल्लेख
पाणीपुरवठा विभागाच्या कामगिरीचा आढावा घेताना त्यांनी राज्यातील विविध योजनांमुळे या विभागाचा निधी आणि कामकाज मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा केला. गेल्या काही वर्षांत पाणीपुरवठा विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर शासन निर्णय (जीआर) जारी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांशी सकारात्मक वागण्याचे आवाहन
महसूल कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सकारात्मक भूमिका ठेवावी, शक्य तितक्या कामांना प्राधान्य देत लोकांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच वाहनचालक, शिपाई, कोतवाल आणि पोलीस पाटील यांसारखे तळागाळातील कर्मचारी हे शासन व्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.कामाच्या तणावातही स्वतःचा एखादा छंद जपणे आवश्यक असल्याचे सांगत, आपण आजही गायनाचा छंद जोपासत असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले.

“महसूल विभाग सक्षम असेल तर जिल्ह्याची प्रशासन व्यवस्था सक्षम राहते”
महसूल विभाग हा नागरिकांशी थेट संपर्कात असलेला विभाग असल्याने त्याची कार्यक्षमता संपूर्ण जिल्ह्याच्या प्रशासनावर परिणाम करत असते. महसूल विभाग सक्षम आणि कार्यक्षम राहिला तर जिल्ह्याची प्रशासन व्यवस्था अधिक प्रभावीपणे चालते, असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या