विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहून उज्ज्वल भविष्य घडवावे : पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ :
महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव येथे शनिवार रोजी अमली पदार्थ जनजागृतीअभियानांतर्गत विद्यार्थ्यांना वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अमली पदार्थांचे सेवन, सोशल मीडियाचा योग्य वापर, ऑनलाइन फसवणूक तसेच कुमारवयातील विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
मार्गदर्शन करताना श्री.बागुल यांनी सांगितले की, भारत हा तरुणांचा देश असून आजचे विद्यार्थी हीच देशाची उद्याची पिढी आहे. विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या आहारी न जाता शिक्षणाला प्राधान्य देऊन उच्च शिक्षण घ्यावे आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत. अमली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर तसेच सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून कायम दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
समाजातील काही व्यक्ती विविध व्यसनांच्या आहारी गेल्या असल्यास त्यांच्या अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याबरोबरच समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर अभ्यासासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी करण्याचा सल्ला दिला. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांचा वापर करताना सावधगिरी बाळगावी. अनोळखी लिंक किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणालाही ओटीपी, बँक खात्याची माहिती अथवा इतर गोपनीय माहिती देऊ नये. अशा प्रकारची काळजी घेतल्यास ऑनलाइन फसवणूक व आर्थिक नुकसान टाळता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुमारवयीन विद्यार्थ्यांनी आपल्या वाढत्या वयाबरोबरच मानसिक व सामाजिकदृष्ट्याही सजग राहणे आवश्यक आहे. आपल्या हातून अशी कोणतीही चूक होऊ नये, ज्यामुळे स्वतःचे तसेच आई-वडिलांचे नाव खराब होईल, यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असेही श्री. बागुल यांनी सांगितले.
विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन करताना त्यांनी आवाहन केले की, कोणाकडूनही त्रास होत असल्यास घाबरून न जाता त्याची माहिती तातडीने शिक्षक-शिक्षिका किंवा पोलीस विभागातील संबंधित व्यक्तींना द्यावी. आपल्या अडचणी लपवून न ठेवता विश्वासू व्यक्तींशी शेअर कराव्यात, जेणेकरून योग्य ती कार्यवाही करून विद्यार्थिनींना न्याय व संरक्षण मिळू शकेल.श्री.बागुल यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर राहण्यासोबतच सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहणे, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणे आणि आपल्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेणे याबाबत महत्त्वपूर्ण संदेश मिळाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरणगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक संजय चौधरी होते. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सी.जे. तायडे सर, पर्यवेक्षक पी. एस. झोपे सर तसेच वरणगाव पोलीस स्टेशनचे विजय बाविस्कर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी. बी.खर्चे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

