अजिंठा चौकातील भंगार बाजारावर महापालिकेचा हातोडा?
कराराची मुदत संपूनही जागेचा ताबा न सोडणाऱ्या व्यावसायिकांना अंतिम नोटीस; महापालिका कारवाईच्या तयारीत
जळगाव | खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : शहरातील अजिंठा चौकाजवळ महापालिकेच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जागेवर थाटलेल्या भंगार बाजारातील व्यावसायिकांचा करार संपूनही त्यांनी जागेचा ताबा कायम ठेवल्याने आता महापालिका प्रशासनाने कारवाईची तयारी सुरू केली आहे. जागा स्वतःहून रिकामी करण्याची शेवटची संधी म्हणून संबंधित व्यावसायिकांना अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे.
महापौरांच्या आदेशानंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
महापालिकेच्या मालकीच्या जागांचा ताबा पुन्हा मिळविण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. ज्या जागांचे करार संपले आहेत, त्या जागा तातडीने महापालिकेच्या ताब्यात घेण्याचे आदेश त्यांनी नगररचना विभागाला दिले आहेत.
या आदेशानंतर नगररचना विभागाने भंगार बाजाराशी संबंधित जुन्या फायली, करारपत्रे आणि अन्य कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. यापूर्वी संबंधित दुकानदारांना जागा रिकामी करण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या का, याचीही पडताळणी केली जात आहे.
नोटीस दिली असेल तर थेट कारवाई
महापालिका प्रशासनाच्या तपासणीत यापूर्वीच जागा रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यास, संबंधितांना पुन्हा मुदत देण्यात येणार नसल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून थेट घटनास्थळी जाऊन अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
मात्र, यापूर्वी कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नसेल, तर संबंधित व्यावसायिकांना एक महिन्याची मुदत देऊन अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधीच्या मध्यस्थीलाही दिलासा नाही
दरम्यान, भंगार बाजारातील दुकानदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका लोकप्रतिनिधीने काही काळापूर्वी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, महापालिका प्रशासनाकडून नियमानुसारच कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका घेत कोणताही विशेष दिलासा देण्यास नकार देण्यात आल्याचे समजते.
कारवाई कधी? शहराचे लक्ष
कराराची मुदत संपल्यानंतरही महापालिकेच्या जागेचा ताबा कायम ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासन आता नेमकी कधी कारवाई करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचा ताबा पुन्हा मिळविण्याच्या मोहिमेत अजिंठा चौकातील भंगार बाजारावर होणारी कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.

