Wednesday, September 16, 2026
Homeजळगाववरणगावातील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रक्षा खडसे यांची सकारात्मक भूमिका

वरणगावातील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रक्षा खडसे यांची सकारात्मक भूमिका

वरणगावातील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रक्षा खडसे यांची सकारात्मक भूमिका

कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांची केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याशी सदिच्छा भेट

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              वरणगाव, ता भुसावळ :
आयुध निर्माणी वरणगाव येथील IDEU कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा ताई खडसे यांची सदिच्छा भेट घेऊन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी युनियनच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात मोठ्या संख्येने केंद्रीय कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी जळगाव जिल्ह्यात केंद्रीय सरकारी आरोग्य योजना (CGHS) वेलनेस सेंटर सुरू करावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. या सुविधेमुळे केंद्रीय कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आरोग्यविषयक दिलासा मिळणार आहे.
तसेच आयुध निर्माणी वरणगाव येथील केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिलीसाठी अतिरिक्त तिसरा वर्ग सुरू करावा, अशीही महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि पालकांची मागणी लक्षात घेता अतिरिक्त वर्ग सुरू झाल्यास स्थानिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मोठा फायदा होणार आहे.
याशिवाय केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी वरणगाव येथे NCC कोर्स सुरू करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, देशसेवा आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी NCC प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
वरणगाव परिसरातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाची मागणी करण्यात आली. भुसावळहून नागपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वरणगावजवळ मेन गेट ते वरणगाव रस्त्याला जोडणारा सर्व्हिस रोड तयार करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या सर्व्हिस रोडमुळे आयुध निर्माणी तसेच वरणगाव परिसरातील नागरिकांना महामार्गावर ये-जा करताना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांबाबत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली असून, संबंधित विभागांशी लवकरच पत्रव्यवहार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी IDEU कर्मचारी युनियनचे अध्यक्ष गिरीश खुशालनी, कार्याध्यक्ष सदानंद उन्हाळे, महासचिव उमेश वाघ, JCM सदस्य किरण पाटील, JCM सदस्य सुभाष ससाणे यांच्यासह सत्यपालसिंग राजपूत, शुभम भारंबे, अजय इंगळे, रमाकांत पवार, अंकित ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या