वरणगाव रोडवरील हॉटेलमध्ये अस्वच्छता व अवैध दारू विक्रीचा आरोप


RPI कामगार संघटनेचे संबंधित विभागाला निवेदन; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव, ता. भुसावळ :
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील वरणगाव रोड परिसरातील हॉटेल राजस्थानी येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून, कोणताही वैध परवाना नसताना देशी व विदेशी मद्याची विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप आरपीआय कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन अन्य औषधी विभाग, जळगाव कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आरपीआय कामगार संघटनेचे काही पदाधिकारी जेवणासाठी सदर हॉटेलवर गेले असता तेथे अत्यंत अस्वच्छ परिस्थिती निदर्शनास आली. तसेच हॉटेलमध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना देशी तसेच इंग्लिश दारूची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वरणगाव रोड हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावरून मुंबई-नागपूर मार्गावर धावणारी अनेक ट्रान्सपोर्ट वाहने व अवजड वाहने ये-जा करतात. अनेक वाहनचालक या हॉटेलवर थांबून भोजन करीत असल्याने हॉटेलमधील स्वच्छता व अन्नपदार्थांच्या गुणवत्तेकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.तसेच हॉटेलमध्ये ग्राहकांना पिण्यासाठी केमिकलयुक्त प्लास्टिकच्या ड्रममध्ये साठवलेले पाणी दिले जात असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून, संबंधित हॉटेलची तातडीने तपासणी करून दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी कारवाई न झाल्यास आरपीआय कामगार संघटना तसेच त्रस्त नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हा मुख्य संघटक विक्रमजी प्रधान, जिल्हा उपसंघटक दीपक नाटेकर, खजिनदार सचिन सोनवणे, सल्लागार दीपक मगर व प्रकाश सोनवणे, सदस्य चेतन ब्राम्हणे, करण इंगळे आणि सांगर इंगळे, सुमित निकम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, निवेदनातील आरोपांची संबंधित विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी व चौकशी झाल्यानंतरच त्याबाबतचे तथ्य स्पष्ट होणार असून, प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

