दहा रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया


रामपेठ येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
वरणगाव. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शहरातील रामपेठ भागात समता फाउंडेशन, कांताई नेत्रालय जळगाव आणि नगरसेविका माधुरी हळदे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात रामपेठ परिसरातील तब्बल ५० रुग्णांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
तपासणीदरम्यान दहा रुग्णांच्या डोळ्यांमध्ये मोतीबिंदू आढळून आला. यापैकी तीन रुग्णांवर बुधवारी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. तर उर्वरित सात रुग्णांची डायबिटीस, रक्तदाब (बीपी) तसेच इतर आवश्यक वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर जळगाव येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष अरुणा इंगळे, नगरसेविका श्रद्धा गायकवाड, वाय. आर. पाटील आणि माजी नगरसेवक गणेश धनगर यांनी उपस्थित राहून नेत्र तपासणी करून इतरांना देखील डोळ्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.
ग्रामीण व परिसरातील अनेक गरजू नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे अथवा रुग्णालयापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने नेत्र तपासणी व उपचारापासून वंचित राहावे लागते. अशा नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरले. तपासणीद्वारे मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची वेळेत ओळख होऊन त्यांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी मदत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी नितीन जैन, कुणाल वंजारी आणि संदीप हळदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

