Saturday, September 12, 2026
Homeजळगाववरणगावात बैलपोळ्याचा जल्लोष; नंदी सजावट स्पर्धेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

वरणगावात बैलपोळ्याचा जल्लोष; नंदी सजावट स्पर्धेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

वरणगावात बैलपोळ्याचा जल्लोष; नंदी सजावट स्पर्धेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

१६ बैलजोड्यांनी घेतला सहभाग; आकर्षक सजावटीने वेधले नागरिकांचे लक्ष

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             वरणगाव ता भुसावळ :
शेतकऱ्यांच्या जीवनातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि कृतज्ञतेचा सण असलेल्या बैलपोळ्याचा उत्साह वरणगाव शहरात मोठ्या जल्लोषात पाहायला मिळाला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी तसेच बैलपोळा सणाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट नंदी सजावट स्पर्धेला शहरातील शेतकरी व बैलजोडी मालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत तब्बल १६ बैलजोड्यांनी सहभाग घेतला असून, रंगीबेरंगी सजावट आणि पारंपरिक साजशृंगाराने सजलेल्या बैलजोड्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

बैल हा शेतकऱ्याच्या कष्टाचा आणि शेतीचा अविभाज्य साथीदार मानला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या या मुक्या जीवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा बैलपोळ्याच्या माध्यमातून जपली जाते. याच भावनेतून वरणगाव शहरात नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या बैलजोड्यांना पारंपरिक तसेच आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते.


या स्पर्धेत नागोरी, खिल्लारी, पंढरपुरी तसेच रेडी आदी विविध जातींच्या बैलजोड्यांचा सहभाग होता. रंगीबेरंगी झूल, विविध प्रकारचे गोंडे, फुलांच्या माळा, शिंगांना केलेली आकर्षक सजावट तसेच पारंपरिक साजामुळे बैलजोड्यांचे रूप अधिक खुलून दिसत होते. सजविलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विशेषतः महिला, युवक आणि बालकांमध्ये या सजावटीबाबत मोठी उत्सुकता दिसून आली.

शेतकऱ्यांचा सन्मान – –
स्पर्धेत सहभागी झालेल्या बैलजोडी मालकांचा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. बैलांची सजावट, त्यामागील मेहनत आणि शेतकऱ्यांची बैलांप्रती असलेली आत्मीयता यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला पारंपरिकतेसोबतच भावनिक स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी मुक्ताईनगर पोलिस उपविभागीय अधिकारी राजनंद पाटील, चंद्रकांत बढे सर, नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष अरुणाताई इंगळे, प्रा. जतीन मेढे, शामराव धनगर, मिलिंद मेढे, शेख अखलाक, सपोनि अमित बागुल आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी बैलपोळा सणाचे महत्त्व अधोरेखित करत शेतकरी आणि त्यांच्या कष्टकरी साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पारंपरिक सणांच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती, शेतकऱ्यांची जीवनपद्धती आणि आपल्या मातीत रुजलेल्या परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नागरिकांची मोठी गर्दी – –
बैलपोळा आणि नंदी सजावट स्पर्धेचे आकर्षण नागरिकांमध्ये चांगलेच पाहायला मिळाले. सजविलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अनेकांनी या देखण्या बैलजोड्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढत हा उत्सव आपल्या आठवणीत साठवून ठेवला.
या उपक्रमामुळे वरणगाव शहरातील शेतकरी, बैलजोडी मालक आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पारंपरिक बैलपोळा सणाला आधुनिक स्पर्धेची जोड देत शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आणि बैलांशी असलेल्या नात्याचा गौरव करणारा हा उपक्रम ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद भैसे यांनी केले, तर आभार सुनील काळे यांनी मानले. उपस्थित नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या