लाचखोर पोलीस हवालदाराला तीन वर्षांचा कारावास; पाच हजारांचा दंड
नाशिक खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – लाचखोरीच्या प्रकरणात नाशिक तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार रामचंद्र राजाराम आडके यांना न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंडाची रक्कम न भरल्यास आणखी चार महिने कारावास भोगावा लागणार आहे.
तक्रारदार आणि त्यांच्या चुलत भावाविरुद्ध नाशिक तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदार आडके यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले. या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाल्यानंतर २४ सप्टेंबर २०२४ रोजी सापळा रचण्यात आला.कारवाईदरम्यान आडके यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. लाच स्वीकारल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास पूर्ण करून प्रकरण न्यायालयात दाखल केले.न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे, कोर्ट क्रमांक ४, नाशिक यांनी रामचंद्र आडके यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड सुनावला.
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सचिन गोरवाडकर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. या कारवाईत पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेराठे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास शिवाजी लोंढे, पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे, हवालदार प्रभाकर गवळी, हवालदार किरण धुळे आदींनी काम पाहिले.
नागरिकांना लाचलुचपत विभागाचे आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी विलंब न करता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे. लाचखोरीसंदर्भातील तक्रारींसाठी १०६४ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

