गांधी पुतळ्याच्या दुरवस्थेविरोधात युवकांची गांधीगिरी
प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात युवकांची ‘गांधीगिरी’
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर यावल नाका परिसरातील गांधी पुतळ्याची दुरावस्था समोर आली आहे. परिसरातील स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, तुटलेले दिवे, हिरवळीची देखभाल तसेच नामफलकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप युवकांनी केला आहे.
गांधी पुतळ्याच्या परिसरात यापूर्वी पेव्हर ब्लॉक, हिरवे गवत आणि प्रकाश व्यवस्था यांसह सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र सध्या काही दिवे बंद असून काही तुटलेल्या अवस्थेत आहेत. परिसराची नियमित स्वच्छता व देखभालही होत नसल्याचे युवकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे पुतळ्याचा नामफलकही सध्या दिसून येत नसल्याने या ऐतिहासिक स्थळाची माहिती पुढील पिढीपर्यंत कशी पोहोचणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
१० ऑक्टोबरपर्यंत सुधारणा करण्याची मागणी
गांधी जयंतीच्या निमित्ताने केवळ पुतळ्याला हार अर्पण न करता परिसर वर्षभर स्वच्छ व सुशोभित ठेवावा, अशी मागणी युवकांनी केली आहे. प्रशासनाने १० ऑक्टोबरपर्यंत आवश्यक सुधारणा न केल्यास गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने ‘गांधीगिरी’ आंदोलन करण्याचा इशारा युवकांनी दिला आहे.
प्रशासनाने कार्यवाही केली नाही तर स्वतःच्या पॉकेटमनीतून पैसे जमा करून गांधी पुतळ्याच्या परिसराचे आवश्यक सुशोभीकरण करण्याचा निर्धारही युवकांनी व्यक्त केला आहे.
निधी व कामाची माहिती जाहीर करण्याची मागणी
गांधी पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी किती निधी खर्च झाला, कामाची वर्क ऑर्डर कोणाला देण्यात आली, काम कधी पूर्ण झाले आणि देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कोणाची आहे, याची माहिती नगरपालिका प्रशासनाने नागरिकांसमोर जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
युवकांनी पुतळ्याची साफसफाई, तुटलेल्या दिव्यांची दुरुस्ती, बंद प्रकाश व्यवस्था सुरू करणे, परिसराचे सुशोभीकरण आणि नामफलक पुन्हा बसविण्याची मागणी केली आहे.
या मागणीसाठी शहजान शेख, जुनेद शेख, मरहूम तसलीम खान फाउंडेशनचे अध्यक्ष जुनेद खान, फरहान कुरेशी, आयान शेख, अफनान खान, अमान सय्यद, हमजा शेख, सैफ शेख यांच्यासह अन्य युवक पुढे आले आहेत.


