Sunday, October 4, 2026
Homeजळगावधनाजी नाना महाविद्यालयात गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा उत्साहात

धनाजी नाना महाविद्यालयात गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा उत्साहात

धनाजी नाना महाविद्यालयात गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा उत्साहात

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

येथील धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्यशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भास्कर वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दोन्ही स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील एकूण बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर स्पर्धांचे उद्घाटन झाले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. मनोहर सुरवाडे होते. वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘डिजिटल युगात गांधी विचार’ हा विषय देण्यात आला होता. या विषयावर विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींचे सत्य, अहिंसा, स्वावलंबन, ग्रामस्वराज्य, साधेपणा आणि नैतिक मूल्ये यांचा आधुनिक डिजिटल युगाशी असलेला संबंध आपल्या प्रभावी वक्तृत्वातून मांडला. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात गांधी विचारांची उपयुक्तता आणि त्यांचे समकालीन महत्त्व यावर विद्यार्थ्यांनी विविधांगी मते व्यक्त केली. तर वादविवाद स्पर्धेसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : रोजगारासाठी धोका की संधी?’ हा विषय देण्यात आला होता. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगाराच्या संधींमध्ये होणारे बदल, तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी नवीन कौशल्ये, रोजगाराचे बदलते स्वरूप तसेच संभाव्य आव्हाने यावर विद्यार्थ्यांनी समर्थन व विरोध या दोन्ही बाजू प्रभावीपणे मांडल्या. विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध मांडणीमुळे वादविवाद स्पर्धेला विशेष रंगत आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. व्ही. ई. सोनजे उपस्थित होते. तसेच स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. आय. पी. ठाकूर व प्रा. शिवाजी मगर यांनी काम पाहिले. यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ताराचंद सावसाकडे तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मच्छिंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

वक्तृत्व स्पर्धेत संचित गोपाळ कोळी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. समीर उस्मान तडवी यांनी द्वितीय, तर आफरिन नबा तडवी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
वादविवाद स्पर्धेचे विजेते
वादविवाद स्पर्धेत नयना नरेंद्र पाटील व आफरिन नबा तडवी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. प्रांजली सुरेश तायडे व विशाल किरण सपकाळे यांनी द्वितीय, तर हेमंत मुकेश येवले व समीर उस्मान तडवी यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. दोन्ही स्पर्धांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एच. जी. नेमाडे होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रांजली तायडे यांनी प्रभावीपणे केले, तर चि. हेमंत येवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. पल्लवी तायडे व प्रा. मंजुश्री पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या