Monday, October 5, 2026
Homeगुन्हारेल्वे विभाग आरपीएफची कारवाईद्वारे 13 चोरीचे मोबाइल फोन जप्त; आरोपी अटक

रेल्वे विभाग आरपीएफची कारवाईद्वारे 13 चोरीचे मोबाइल फोन जप्त; आरोपी अटक

रेल्वे विभाग आरपीएफची कारवाईद्वारे 13 चोरीचे मोबाइल फोन जप्त; आरोपी अटक
भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात प्रवाशांची सुरक्षा तसेच त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने रेल्वे सुरक्षा दलामार्फत “ऑपरेशन यात्री सुरक्षा” राबविण्यात येत आहे. या अंतर्गत रेल्वे सुरक्षा दल, भुसावळच्या सीपीडीएस पथकाने सीसीटीव्ही निगराणी आणि आरपीएफ पथकांमधील त्वरित समन्वयाच्या माध्यमातून प्रभावी कारवाई करत एका आरोपीला 13 चोरीच्या मोबाइल फोनसह पकडले. जप्त करण्यात आलेल्या मोबाइल फोनची एकूण अंदाजे किंमत ₹2,97,500/- असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला  रेल्वे पोलीस (जीआरपी), भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आले.
माहिती नुसार, ट्रेन क्रमांक 01449 पुणे–दानापूर स्पेशलच्या S-3 डब्यातून एका प्रवाशाचा मोबाइल फोन चोरीला होता.
पथकाने भुसावळ स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजचे सखोल निरीक्षण केले. फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती संबंधित ट्रेनमधून उतरून स्थानक परिसरातून बाहेर जाताना दिसून आली. त्यानंतरच्या सीसीटीव्ही निगराणीमध्ये सदर व्यक्ती पुन्हा भुसावळ स्थानकावर येऊन ट्रेन क्रमांक 61130 भुसावळ–बडनेरा मेमोमध्ये चढताना दिसून आली.
संशयित व्यक्तीची माहिती आरपीएफ अकोला यांच्यासोबत शेअर करण्यात आली. तसेच मलकापूर आणि अकोला आरपीएफ पथकांशी तातडीने समन्वय साधण्यात आला. संयुक्त कारवाईदरम्यान मलकापूर स्थानकावर कर्तव्यावर असलेले सहायक सुरक्षा निरीक्षक वीरपाल सिंह तसेच अकोला आरपीएफ पथकातील प्र. आ. गणेश जकाते आणि आ. गोविंद सिंह यांनी संशयित व्यक्तीला मलकापूर स्थानकावर ताब्यात घेतले.

आरोपीला भुसावळ आरपीएफ पोस्ट येथे आणून त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अंकित साहू उर्फ दीपक साहू, वय 25 वर्षे, रा. इंद्रानगर, कोरबा, छत्तीसगड असे सांगितले.

आरोपीच्या झडतीदरम्यान त्याच्याकडील निळ्या रंगाच्या “Aerollit” असा उल्लेख असलेल्या बॅगमधून एकूण 13 मोबाइल फोन जप्त करण्यात आले. या मोबाइल फोनची एकूण अंदाजे किंमत ₹2,97,500/- आहे. जप्त करण्यात आलेले मोबाइल फोन सॅमसंग, ओप्पो, रियलमी, वनप्लस, रेडमी, विवो, इन्फिनिक्स आणि जिओ भारत या विविध कंपन्यांचे आहेत.

चौकशीदरम्यान आरोपीने प्राथमिक स्वरूपात सांगितले की, सदर मोबाइल फोन त्याने मागील 1–2 दिवसांत भुसावळ आणि मलकापूरदरम्यान धावणाऱ्या विविध गाड्यांमधून चोरी केले होते.
आरोपी तसेच जप्त करण्यात आलेले मोबाइल फोन आवश्यक पुढील कायदेशीर कारवाईसाठी रेल्वे पोलीस (जीआरपी), भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आले.

भुसावळ विभाग प्रवाशांना आवाहन करते की, रेल्वे प्रवासादरम्यान आपल्या मोबाइल फोन, सामान तसेच इतर मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी. तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्याची त्वरित माहिती रेल्वे सुरक्षा दल/जीआरपी दयावी असे आवाहन करण्यात आले .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या