Monday, October 5, 2026
Homeकृषीदुष्काळ पंचनाम्यांवरून आमदार अमोल जावळे आक्रमक

दुष्काळ पंचनाम्यांवरून आमदार अमोल जावळे आक्रमक

दुष्काळ पंचनाम्यांवरून आमदार अमोल जावळे आक्रमक

बामनोद, फैजपूर येथील तलाठी व सर्कल कार्यालयांना अचानक भेट; अनावश्यक कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याच्या सूचना                                फैजपूर      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असताना अनावश्यक कागदपत्रांची अट घालून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारींची आमदार अमोल जावळे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी बामनोद व फैजपूर येथील तलाठी आणि सर्कल कार्यालयांना अचानक भेट देत पंचनाम्याच्या प्रक्रियेची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना विनाकारण कागदपत्रांसाठी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

पंचनाम्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले आधारकार्ड, डीबीटीद्वारे मदत जमा करण्यासाठी आवश्यक बँक खाते तपशील आणि ॲग्रीस्टॅकशी संबंधित माहिती घ्यावी. मात्र, आवश्यकता नसताना ७/१२ उतारा, ८-अ यांसारख्या कागदपत्रांची मागणी करू नये, असे आमदार जावळे यांनी स्पष्ट केले. आवश्यक कागदपत्रे घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुलभ पद्धतीने पूर्ण करावी आणि केवळ अनावश्यक कागदपत्रांअभावी कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

“दुष्काळामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. कागदपत्रांच्या नावाखाली त्याची अडवणूक करू नका आणि त्याला कार्यालयांच्या फेऱ्या मारायला लावू नका. आवश्यक माहिती घेऊन पंचनामे वेळेत पूर्ण करा,” अशा स्पष्ट शब्दांत आमदार जावळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

यावेळी त्यांनी कार्यालयीन कामकाजाची तसेच दुष्काळ पंचनाम्यांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. रावेर-यावल मतदारसंघातील सर्व संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल कार्यालयांनी याच पद्धतीने पंचनाम्याची प्रक्रिया राबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान, अनावश्यक कागदपत्रांबाबत निर्माण झालेल्या या प्रकाराची आमदार जावळे यांनी दखल घेतल्यानंतर प्रशासनाने यासंदर्भातील तत्काळ आदेश मागे घेतले. त्यामुळे पंचनाम्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना अनावश्यक कागदपत्रांच्या अटीपासून दिलासा मिळणार आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी पंचनामे पारदर्शक, सुलभ आणि विनाविलंब पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही आमदार जावळे यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या