डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रावेर महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन
रावेर तालुका खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

रावेर : येथील श्री व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘वाचन प्रेरणा दिना’चे औचित्य साधून पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आणि ग्रंथालय सल्लागार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाची व्याप्ती वाढावी तसेच विविध विषयांतील पुस्तके आणि संदर्भसाहित्य यांची ओळख व्हावी, हा प्रदर्शनामागील मुख्य उद्देश होता.
या पुस्तक प्रदर्शनात विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि ग्रंथालयातील उपलब्ध वाचनसामग्री पाहण्याची संधी मिळाली. वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास, वैचारिक प्रगल्भता आणि ज्ञानवृद्धी साध्य होते. आजच्या डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व कायम असून विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. बी. जी. मुख्यदल यांनी सदर ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले होते. यासाठी ग्रंथालय सल्लागार समितीचे प्रा. एस. यू. पाटील, डॉ. व्ही. बी. सूर्यवंशी आणि डॉ. जी. आर. धेंबरे यांनी उपक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि ग्रंथालयाशी संबंधित सदस्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतला. सदर ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, डॉ. एस. डी. धापसे, एन. ए. घुले, डॉ. एस. बी. धनले, प्रा. एस. डी. महाजन, प्रा. तेजस दसनूरकर, प्रा. वैभव जोशी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी श्री सुनील मेढे, जयेश बढे, रितिक गाढे आदीने सहकार्य केले.

