सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र वाटप तसेच सायबर सिक्युरिटी बाबत मार्गदर्शन
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील तहसील कार्यालयाच्या वतीने सेवा संकल्प अभियान सध्या राबविण्यात येत असून विविध उपक्रम या अंतर्गत राबवले जात आहेत ,त्याचाच एक भाग म्हणून,अभियानांतर्गत वासुदेव जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना 49 ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र वितरित करण्यात आले . आज पावेतो 504 ज्येष्ठांना जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र तहसील कार्यालयाच्या वतीने निर्गत करण्यात आलेले आहेत. तसेच ज्येष्ठांची होणारी सायबर फसवणूक आणि त्याची व्याप्ती बघता त्याला आळा घालण्यासाठीच्या उपयोजनाबाबत श्रीमती जगताप पोलीस उपनिरीक्षक शहर पोलीस स्टेशन यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
श्रीमती निता लबडे तहसीलदार,भुसावळ यांनी देखील सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. वय वर्ष 60 च्या वरील नागरिकांना वृद्ध न संबोधता ज्येष्ठ आणि अनुभवाने समृद्ध असे व्यक्ती म्हणून संबोधावे, तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यावी व अवलंबित्व कमी करावे असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाप्रसंगी संघाचे अध्यक्ष पी जी पाटील आणि सचिव सतीश जंगले हजर होते.

