कामाच्या शोधात निघाले, मृत्यूच्या जाळ्यात अडकले! सूरतमध्ये जळगावच्या कुटुंबासोबत थरारक घटन

सूरतमध्ये थरारक घटना; चार जणांनी कार अडवून संपूर्ण कुटुंबाला खोल कालव्यात फेकल्याचा आरोप, १३ वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला
सूरत खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी : गुजरातमधील सूरत जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कामाच्या शोधात निघालेल्या जळगाव परिसरातील एका कुटुंबाची कार अडवून चार जणांनी कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने खाली उतरवले आणि एकापाठोपाठ एक खोल कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. या घटनेत आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह आढळले असून दोन लहान मुले अद्याप बेपत्ता आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून त्यांचा शोध सुरू आहे.
सूरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ ही घटना घडली. मूळचे जळगाव परिसरातील असलेले हे कुटुंब एरंडोल येथील एका कारखान्यात मजुरीचे काम करत होते. मात्र, कामाच्या शोधात कुटुंबातील सदस्य २१ तारखेला कारने सूरतच्या दिशेने निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांची कार बारडोलीतील उवा कालव्याजवळ पोहोचली असता दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांचा रस्ता अडवला.
त्यानंतर आरोपींनी कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने कारमधून खाली उतरवून खोल कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. यावेळी पाण्यात फेकलेल्या १३ वर्षीय मुलाच्या हाताला कालव्यातील एक पाइप लागला. त्याचा आधार घेत त्याने आपला जीव वाचवला. त्यानंतर त्याने जवळच्या हॉटेलमध्ये धाव घेत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. हॉटेलमधील व्यक्तींनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
कालव्यात तिघांचे मृतदेह आढळले
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. महुआ तालुक्यातील डुंगरीजवळील काकरापार कालव्यात एक पुरुष, एक महिला आणि एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांनी मृतदेहांची ओळख पटवली. मृतांमध्ये नितीन पाटील आणि कविता पाटील यांचा समावेश आहे. तर कुटुंबातील दोन मुले अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
चार जणांविरोधात तक्रार दाखल
या थरारक घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींनी कुटुंबाला कालव्यात का फेकले? हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला की त्यामागे अन्य काही कारण आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी खंडिया, आभा, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

